स्त्री गाडी चालवते हा तसा कुतूहलाचा विषय . अगदी एका दशकापूर्वी चार चाकी गाडी चालविणारी महिला केवळ आपण चित्रपटात पाहायचो पण आता शहरात ड्राइवर सीटवर महिला ड्रायविंग करताना सहज पाहायला मिळत. बरेच जण महिला गाडी चालविते म्हंटल्यावर अनेक तर्क वितर्क लावत त्यांना कमी लेखायलाही मागे पुढे पाहत नाहीत . पण या सगळ्याला छेद देत पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवण्याचं काम केलं विद्या अनिल शेळके या मराठमोळ्या कॅब ड्राइवरने . विद्या शेळके मुंबईकर या नावाने परिचित असणाऱ्या या कॅब ड्राइवर मुलुंड , मुंबई येथे राहतात . एक स्वयंपाकीण ते कॅब चालक हा प्रवास करताना त्यांना अनेक खाचखळग्यांचा प्रवास करावा लागला .
छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यातील एका छोट्या खेडेगावात जन्माला आलेल्या विद्याचे अवघ्या १६ वर्षी लग्न झाले. लग्नानंतर विद्या मुलुंड मुंबईला आपला संसार करू लागली. नवरा पेशाने ड्राइवर तो ट्रकने मार्केट यार्डमध्ये भाजीपाला पोहोचवायचा . विद्यानेही संसारात मदत करायची या हेतूने मुंबईत एका मार्केटिंग कंपनीत काम सुरु केले. मार्केटिंगच्या कामात फार काळ मन रमले नाही . विद्याने अनेक ठिकाणी नोकरी केली पण समाधान मिळाले नाही . कोणाच्या हाताखाली काम करावे आणि पगार घ्यावा ही प्रक्रियाच विद्याच्या पचनी पडली नाही . एकेदिवशी विद्याने आपल्या नवऱ्यासमोर स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याविषयी विचार मांडला . नवऱ्याने तिला पाठिंबा दिला. पण नेमका कोणता व्यवसाय करावा याचा शोध विद्या घेत होती.
एके दिवशी महिलांसाठी मोफत रिक्षा वाटप अशी जाहिरात तिच्या हाती पडली . ती क्षणाचाही विलंब न लावता जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर ती पोहोचली . ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुलुंड शाखेचे कार्यालय होते . तिथे रिक्षा व्यवसायासाठी मिळणाऱ्या मोफत प्रशिक्षणासाठी तिने नाव नोंदणी केली . विद्याने महिन्याभरात रिक्षा प्रशिक्षण घेतले आणि नवी कोरी रिक्षा घेतली . महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक , अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते विद्याला रिक्षा प्रदान करण्यात आली . विद्यासोबत अजून १२ महिलाना मनसे पक्षातर्फे रिक्षा प्रदान केल्या गेल्या .
पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या रिक्षा व्यवसायात एक महिला रिक्षा ड्राइवर म्हणून विद्याच नाव होऊ लागलं . विद्या रिक्षा व्यवसायात स्थिर होत असतानाच तिला आता चार चाकी गाडी खुणावू लागली . चार चाकी गाडीचं प्रशिक्षण घेऊन तीन कार घेतली . ओला , उबर या कार रेंटल सुविधेच्या माध्यमातून व्यवसायाचा चांगला जम बसवला . २०२० मध्ये कोरोनाच संकट आलं आणि जनसामन्याप्रमाणं विद्यावरही संकट कोसळलं . विद्याने हार मानली नाही अत्यावश्यक सेवेत सामाविष्ट असणारी सर्व काम ती करू लागली . कोरोनामुळे दळणवळण पूर्ण बंद होते . ज्येष्ठ नागरिक , गरोदर स्त्रिया , अपंग लोक यांची होणारी अडचण विद्याच्या लक्षात आली . विद्याने कोरोना काळात गरजू लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला .
विद्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ करून गरजू नागरिकांना आपली कॅब सुविधा उपलब्ध असल्याचे आवाहन केले. या व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद मिळाला . विद्याने गरजू लोकांना मुंबईत पोहोचवण्याचे काम सुरु केले . एकीकडे जनजीवन ठप्प होते , कोरोनामुळे लोक जीव गमावत होते पण विद्या मात्र जीवावर उदार होऊन आपलं काम करत होती .विद्याच्या या कामाची दखल अनेक माध्यमांनी घेतली याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थांनी तिचा सन्मान केला . विद्याने आपली उत्तम व्यावसायिकता जपत संपूर्ण भारतभर भ्रमण केले आहे . या माध्यमातून अनेक लोकांचा जनसंपर्क तयार केला आहे. रात्री – अपरात्री सुद्धा ती प्रवाशांसोबत बिनधास्त प्रवास करते. विद्याला या व्यवसायात अनेक अडचणी आल्या पण प्रत्येकवेळी जिद्दीने त्यावर मात केली . एक महिला ड्राइवर आहे याचा फायदा घेऊन बऱ्याचदा तिच्याशी प्रवाशी भाड्याला घेऊन हुज्जत घालतात पण शिताफीने ती अशा प्रवाशांशी बोलून प्रसंग निभावून नेते . विशेष म्हणजे विद्या साडी नेसूनच ड्रायविंग करते .
विद्या अनिल शेळके मुंबईकर असं ब्रीद घेऊन ती सोशल मीडियावर प्रसिदध आहे . इंस्टाग्रामवर (vidhya_shelke_09) तिचे तब्बल ३० हजार फोल्लोवर्स आहेत तर यु ट्यूब वर
सुद्धा ती Vindhya Shelke Mumbaikar या नावाने आपले प्रवासाचे व्हिडिओ बनवून प्रसारित करत असते . आपल्या आवडीचं काम आणि कामाचं दाम असा जीवनाचा प्रवास ती करत आहे .
विद्या राज ठाकरे याना आपलं दैवत मानते कारण जर त्यांच्या पक्षाने महिलांसाठी अशी संधी निर्माण केली नसती तर कदाचित विद्या घडली नसती . विद्याने आपल्या कारकिर्दीत तीन वाहन घेतली . या प्रत्येक वाहनाच्या मागील काचेवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राज ठाकरे यांचा फोटो मोठ्या सन्मानाने लावते .
एका छोट्या खेडेगावातून येऊन पुरुषांच्या मक्तेदारी असणाऱ्या क्षेत्रात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण करणे सोपं नाही . जिद्दीच्या जोरावर विद्याने हे करून दाखवलं आहे . जिद्दी आणि ध्येयवेड्या विद्याचा प्रवास सुखरूप होवो हीच सदिच्छा.