घरात पाळणा हलणार म्हंटल्यावर पालकांच्या मनात अनेक स्वप्नं फेर धरून नाचतात . आईच्या पोटात असतानाच त्याच्या अर्थात आईच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात . या आनंदात केवळ आई-बाबा नसतात तर एक नवीन जीव अनेक नवी नाती निर्माण करतो . दादा,दीदी,मामा-मामी,आजा-आजी, मावशी , काका अशा अनेक नात्याना जगण्याला नवा आधार मिळतो .अपत्य जन्माला येणं आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो . मुलाला जन्म देणं म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्म म्हंटले जाते , पण जेव्हा आई एखाद्या दिव्यांग मुलाला जन्म देते तेव्हा काय म्हणावं ? पुनर्जन्म झाल्याचा आनंद तर दूरच पण दिव्यांग मुलं जन्माला आलं यामुळं काय वेदना सहन कराव्या लागत असतील याचा विचारच न केलेला बरा.
.
येथून सुरू होतो मुलांचा आणि पालकांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास. रस्त्यात, गर्दीत, शाळेत अशा मुलांना त्यांचे व्यंग अधोरेखित करत लंगड्या, पांगळ्या, मुक्या, बहिऱ्या, वेड्या अशी हाक दिली जाते . समाजात अशाही मुलांना एक वेगळे स्थान असते हे अधोरेखित करणारी एकमेव गोष्ट म्हणजे दिव्यांग पालक आणि दिव्यांगांची शाळा . अदिती शार्दूल या अशाच एका दिव्यांग मुलाच्या आई आहेत .सुखी संसारात रममाण झालेल्या आदिती यांच्या आयुष्यात आई होण्याचा क्षण आला . मुलाचे नाव हर्ष ठेवले . २ वर्षानंतर त्यांना जाणीव झाली कि आपला मुलगा दिव्यांग आहे .
आपला मुलगा दिव्यांग आहे आणि याचं भविष्य अधांतरी असणार आहे या भीतीने त्यांच्या नवऱ्याने अदिती याना मुलाला सोडण्याचा सल्ला दिला . जन्मदात्री आईने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत हर्ष ची साथ न सोडण्याचा निर्णय घेत आपल्या पतीशी घटस्फोट घेतला . अदिती शार्दूल यांच्या जीवनाचा प्रवास खऱ्या अर्थाने इथून सुरु झाला . दक्षिण आफ्रिका ते छत्रपती संभाजीनगर हा त्यांचा प्रवास म्हणजे एक अग्निदिव्यच म्हणावे लागेल . छत्रपती संभाजीनगर येथे आल्यानंतर त्यांनी दिव्यांग मुलगा हर्षला सोबत घेऊन जीवनाचा नवा प्रवास सुरु केला. सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित , विहंग विशेष मुलांची शाळेची जबाबदारी त्यांच्यावर आली . मुलगा हर्ष सोबत शाळेत शहरातील ५० हुन अधिक विद्यार्थी येथे शिकतात .
अदिती शार्दूल आज विहंग विशेष मुलांच्या शाळेत प्रोजेक्ट हेड म्हणून कार्यरत आहेत . आदिती शार्दूल यांचा मुलगा दिव्यांग असल्याने दिव्यांग मुलांच्या समस्यांची त्यांना चांगली जाण आहे . छत्रपती संभाजीनगर येथे त्या विहंग विशेष मुलांची शाळा त्या पूर्ण क्षमतेने चालवत आहेत.
मूल दिव्यांग, त्याचे आयुष्य आणि आपल्यानंतर त्याच्या जगण्याची काळजी, त्यात सामाजिक जीवनातले संघर्ष, नात्यातले दुरावे, आर्थिक नियोजन हे वरवरचे प्रश्न त्यांना आहेतच. मात्र अजूनही कोणत्याच व्यंग, विकलांग, यावर जगाच्या पाठीवर कोठेच खात्रीशीर उपचार नाही, ही खरी शोकांतिका आहे. आज प्रगत राष्ट्रांतही सर्व प्राथमिक आणि प्रायोगिक श्रेणीत यावर शोध आणि संशोधन आहे. मग बाबा, भोंदू, गल्लाभरू आणि भावनेशी खेळ करणारे आपले गळ टाकतात, त्यात हे पालक मासे अडकतात. नाकातोंडात पाणी गेल्यावर जिवाच्या आकांताने तेथून सुटतात.
संस्था आणि शाळा चालवणाऱ्यांचे अनुभव खूप बोलके आहेत. असे संस्थाचालक समोर दिसले की, इतरांना वाटते आले हे मदत मागायला किंवा मुलांनी केलेले उटणे, उदबत्त्या, मेणबत्त्या, ग्रीटिंग, फिनेल, पणत्या विकायला. समाज म्हणजे आपणच सारे, पण एका मर्यादेपलीकडे यात कोणालाच स्वारस्य नसते. प्रत्येकाला पुढे धावायचे आहे, प्रगती करायची आहे, त्यांच्या विवंचना आहेत. मग या लष्कराच्या भाकरी कोण भाजणार?
आदिती शार्दूल आपल्या मुलावर गेली २० वर्ष मेहनत घेत आहेत . सामान्य मुलाप्रमाणे त्याला सर्व गोष्टीचे ज्ञान देण्याचा ते प्रयत्न करत असतात . दिव्यांग मुले आयुष्याच्या कोणत्या वळणावर खरोखर स्वावलंबी होतील हे कळत नाही. आॅटिस्टिक, मतिमंद, अस्थिव्यंग, डाउन्स सिंड्रोम आणि एखादा अवयव क्षतिग्रस्त नसेल तर असे बहुविकलांग मूल काही प्रमाणात आपली स्वत:ची कामे करू शकतात . काही शिक्षणात प्रगती करतात पण शारीरिक कामात त्यांना मदत घ्यावी लागते.
महाराष्ट्र शासनाने दिव्यांगांसाठी भारतातील सर्वात पहिला दिव्यांग विभाग सुरु केला आहे . डिसेंबर २०२२ मध्ये याची सुरुवात झाली आहे . समाजात आजही दिव्यांग मुलांना साधारण मुलांप्रमाणे सांभाळ करून वाढवणारे पालक आहेत . मुलं शरीराने दिव्यांग असली तरी मनाने कोणतही व्यंगत्व त्यांच्यात नाही ही भावना जपून पालक त्यांचे पालन पोषण करत आहेत . महाराष्ट्रात जवळपास ६ लाखाहून अधिक दिव्यांग आहेत. दिव्यांगांच्या अनेक समस्या आहेत ज्याचे निराकरण अनेक वर्ष केवळ कागदावरच मांडलेले आहे .
येत्या काही वर्षात विहंग विशेष शाळा विस्तारित होणार आहे . दिव्यांगांसाठी विविध सोयींनी युक्त अशी शाळा उभा करण्याची मोहीम आदिती शार्दूल यांनी हाती घेतली आहे .
निश्चितपणाने दिव्यांगांसाठी ही शाळा एक नवसंजीवनी देईल . Y Marathi टीम तर्फे विहंग शाळा व त्यांच्या कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा .
शाळेचा पत्ता :
सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ संचलित ,
विहंग विशेष मुलांची शाळा
प्लॉट नंबर ४२, कमलनयन बजाज हॉस्पिटल शेजारी , छत्रपती संभाजीनगर
Address :
Vihang Special Child School,
Plot no 42 Uma Gopal Nagar, behind Kamalnayan Bajaj Hospital, Aurangabad, Maharashtra
Mob 99217 50424